जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न
दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी या शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश घोलप होते. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद भेरे, सदस्य गुलाब ठाकरे, शरद चव्हाण, यादवराव डमाळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती उपस्थित पालकांना दिली.
उपशिक्षक विलास जमदाडे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थी स्वच्छता, टापटिपपणा, विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच लोकसहभागातून शाळेला लॅपटॉप व म्युझिक सिस्टीम आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व उपस्थित पालकांनी लोकसहभागाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
उपशिक्षिका सुनंदा घोलप यांनी विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास व त्याबाबत पालकांचे योगदान याविषयावर मार्गदर्शन करताना पालकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
मेळावा प्रसंगी लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षांतील लाभार्थी विद्यार्थ्यांनींच्या उपस्थिती भत्त्याचे वाटप करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पालक विशेषतः माता पालकांची संख्या उल्लेखनीय होती.
पालक मेळावा संपल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात पालकांनी पोषण आहारांतर्गत उसळ- भाताचा आस्वाद घेऊन आहाराबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जमदाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुनंदा घोलप यांनी केले.
कार्यक्रमाला भारत भेरे, वंदना चव्हाण, मनिषा घोलप, मंगला ससाणे आदींसह ग्रामस्थ, पालक, महिला व आजी माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
फोटो:- वनारवाडी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वितरण करताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप घोलप, उपाध्यक्ष शरद भेरे, गुलाबराव ठाकरे, शरद चव्हाण, भाऊसाहेब नांदुरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप आदी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा