*_कोरोनाशी..._*
*_लढा शिक्षणाचा_*
आज कोरोना हे जागतिक संकट बनले आहे आणि या संकटाने सगळ्या जगात थैमान घातले आहे. याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद राहिलेले नाही. खरे पाहिले तर शिक्षण म्हटले की तो मिळविण्याचा प्रत्येक मुलाचा तो अधिकार आहे व प्रत्येक मूल स्वतंत्र असल्याने प्रत्येकाची शिकण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. पारंपारिक शिक्षण पद्धतीत सर्व मुलांना सारखे समजून एकाच पद्धतीने समूह शिक्षण देत आहे. परंतू कोरोनाच्या संकटाने आपल्याला या सामूहिक शिक्षणाच्या भिंती पाडून स्वतंत्र शिक्षण देण्याची व घेण्याची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे, तेव्हा या स्वायत्त विचारांचा प्रत्येक विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उपयोग करून घ्यायला हवा. पारंपारिक शिक्षणाची चाकोरी तोडून शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आल्या परिस्थितीशी झुंजावे व यातून उचित मार्ग काढावा.
कोरोना संकटाने शिक्षण व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले आहेत. अध्ययनाची गती बदलली आहे, वेळेचे परिणाम बदलले,अध्यापन कौशल्यामध्ये बदल झालाय. तेव्हा अशा प्रतिकूलतेला न घाबरता नवनिर्मितीची संधी म्हणून बघावे. या प्रतिकुलतेवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाशी मैत्री करून आपण आपले काम सुलभ बनवू शकतो. आज अनेक शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी झूम अँप, गुगल मिट, गूगल क्लासरूम या सारख्या अॅपचा वापर करून विद्यादानाचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या संपर्कात रहात आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही. शासन देखील आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दूरदर्शन, आकाशवाणी या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करून देत आहे. शासनाचे हे प्रयत्न कितीही स्तुत्य असले तरीही त्याचा उपयोग हा केवळ आर्थिक सुबत्ता असलेल्या व मध्यमवर्गीय कुटुंबांनाच होतोय. स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा या समाजातील सर्वांकडेच उपलब्ध नाहीत. गरिब, कष्टकरी, भटके, आदिवासीबहुल अतिदुर्गम भागात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील असा धोका उत्पन्न झाला होता. आणि ज्या सधन भागांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत त्या भागात पालकांचा स्मार्ट फोनचा स्वतःपुरता वापर असणे, पालकांचे तंत्रज्ञानातील अज्ञान, फोन रिचार्ज नसणे, पालकांचे मोबाईल घेऊन कामावर जाणे, रेंज नसणे अशा अनेक अडचणी आहेतच. परंतू तरीही या सर्व समस्यांवर मात करीत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रेरणेतून, सहकार्यातून अनेक जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात शिक्षक म्हणून "विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे." याबाबतीत सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिक्षकच शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध नवनवीन बाबींचा परिचय करून देत सोबतीने समृद्ध होत आहेत. सरकारी व खाजगी शाळेतील शिक्षक शैक्षणिक व्हिडीओ, ऑनलाईन चाचण्या, तासिका, वेबिनार या माध्यमातून व ज्या मुलांच्या घरी स्मार्ट फोन नाही त्या मुलांना सुरक्षित अंतर ठेवून मंदिरासमोरील सभामंडप, अंगणात, ओट्यावर बसवून ज्ञान दानाचे कार्य करीत आहेत. ज्ञानाची ही गंगा श्रीमंतांच्या बंगल्याबरोबरच गरिबांच्या झोपडीपर्यंत अखंड वाहती ठेवण्याचा प्रयत्न सर्वच शिक्षक तनमनधनाने करतांना दिसून येत आहेत.
कोरोना काळातील शैक्षणिक संकटावर मात करण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ऑफलाईन शिक्षणाचा देखील पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी शिक्षक स्वतःच्याच कल्पकतेतून कृति पुस्तिका, स्वाध्याय पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना मोफत वितरीत करीत आहेत. त्याद्वारे विद्यार्थी स्वतः अभ्यास करू शकतात, अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष भेटीत, फोन काॅल, व्हिडीओ काॅल, काॅन्फरन्स काॅल द्वारे अभ्यासातील शंकांचे निरसन करवून घेऊ लागले आहेत. पाठ्यपुस्तकांचे वाचन करून पाठाखालील स्वाध्याय सोडवून तसेच आकाशवाणी, दूरदर्शनद्वारे आयोजित शैक्षणिक कार्यक्रम पाहून देखील विद्यार्थी अभ्यास करू शकतात त्याचबरोबर वरच्या वर्गात शिक्षण घेणारे मोठे भाऊ बहीण, गल्ली मित्र अथवा सुशिक्षित पालकांचे देखील मार्गदर्शन घेऊन आपली नवनवीन शैक्षणिक बाबी शिकण्याची भूक भागवू शकतात.
प्रत्येकाने आपल्या भूतकाळात डोकावून बघितले तर शाळेतील औपचारिक शिक्षणापेक्षा समाजाकडून, स्वतःच्याच अनुभवातून केलेले ज्ञान नक्कीच दिर्घकाल स्मरणात राहणारे असेल, शिकवलेल्या बाबींपेक्षा स्वतः शिकलेल्या बाबींची यादी नक्कीच मोठी होईल यात काहीच शंकाच नाही. स्वयं शिक्षणातून विद्यार्थी सखोल विचार करायला शिकतील, समस्येच्या मुळाशी जायला शिकतील आणि यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो.
कोरोना संकटात शाळा सुरू होतील की नाही ? किंवा शाळा केव्हा सुरू होतील हे सांगणे कठीण आहे. आजचा असलेला कोरोना उद्या नसेलच हेही खात्रीलायक सांगणे अवघड आहे. आणि शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, वर्गखोल्या सॅनिटाईज करणे आदी नियमांचे पालन विद्यार्थ्यांकडून केले गेले पाहिजे. अद्यापपर्यंत तरी कोरोनावर प्रतिजैविके सापडलेली नाहीत त्यामुळेच जागतिक महामारीच्या या संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाय योजनेच आपल्या हातात आहे.
शिक्षण हे ऑनलाईन असो की ऑफलाईन...ते निरंतन घेणे गरजेचे आहे. या नव्या जागतिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जातांना डिजीटल साक्षरता असणे, संगणक स्मार्ट फोन उपलब्ध असणे ही प्रमुख आव्हाने आहेतच मात्र नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणेच आपण फक्त संकटाकडे न बघता परिस्थिती समजून घेऊन तिच्याशी झुंज देणे व परिस्थितीवर स्वार होणेच गरजेचे आहे.
*श्री. विलास शिवाजीराव जमदाडे*
प्राथमिक शिक्षक,
जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी, तालुका- दिंडोरी
मोबाईल- ९८८१३०७५६३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा